

अमरावती, 23 जुलै (हिं.स.) मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्याच तिमाहीत भंगार विक्रीतून तब्बल १३६.१० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने रेल्वेने सुरू केलेल्या ‘मिशन - झिरो स्क्रॅप स्टेटस’ अंतर्गत ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. रेल्वेने आपल्या पाचही विभागांमध्ये आणि कार्यशाळांमध्ये हे अभियान राबवले असून, टाकाऊ भंगाराचे रूपांतर मौल्यवान महसूल-निर्मिती करणाऱ्या मालमत्तेत केले आहे.
एप्रिल ते जून २०२६ या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील ही कामगिरी गेल्या ५ वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. विशेष म्हणजे, मागील आर्थिक वर्षाच्या (२०२५-२६) पहिल्या तिमाहीतील ७१.९४ कोटी रुपयांच्या उत्पन्नाच्या तुलनेत यंदा तब्बल ८९% ची लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.
भंगार विक्रीतून महसूल मिळवण्यात मुंबई विभागाने मध्य रेल्वेमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. मुंबई विभागाने सर्वाधिक २२.४३ कोटी रुपयांची भंगार विक्री नोंदवली आहे. त्याखालोखाल भुसावळ विभाग (२०.४४ कोटी रुपये), नागपूर विभाग (१९.९८ कोटी रुपये), पुणे विभाग (१८.१९ कोटी रुपये) आणि सोलापूर विभागाने (६.४४ कोटी रुपये) उत्पन्न मिळवले. याशिवाय परळ व माटुंगा कार्यशाळा आणि मध्य रेल्वेवरील इतर शेड्स व युनिट्सनी एकत्रितपणे ४८.६२ कोटी रुपयांचे मोठे योगदान दिले आहे.
रेल्वेच्या कायमस्वरूपी मार्गावरील जुने स्लीपर्स, लोहयुक्त व अ-लोहयुक्त भंगार, तसेच वापरातून पूर्णपणे बाद झालेले जुने रेल्वे डबे आणि वॅगन्स यांसारख्या विविध प्रकारच्या टाकाऊ साहित्याची शास्त्रोक्त व पद्धतशीर विल्हेवाट लावून महसूल गोळा केला आहे. या मोहिमेमुळे रेल्वे परिसर स्वच्छ व सुंदर होण्यासही मदत होत आहे.
- डॉ. स्वप्नील निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी