

रायगड, 23 जुलै (हिं.स.) - नेरळ येथील सम्राट नगर व मुख्य बाजारपेठ परिसरात वडाच्या झाडाच्या फांद्या विजेच्या तारांवर पडल्याने वीजतारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे कालपासून (२२ जुलै) आज २३ जुलैपर्यंत नागरिकांना अंधारात दिवस काढावा लागत असून, सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
हे काम प्रत्यक्षात उन्हाळ्यात पूर्ण होणे अपेक्षित होते. मागील वर्षी रेल्वे प्रशासनाकडे धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यानंतरही वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, वेळेत कारवाई न झाल्याने अखेर झाडाच्या फांद्यांमुळे विजेच्या तारा तुटल्या आणि संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला.
सतत वीज नसल्यामुळे अनेक घरांतील इन्व्हर्टरची बॅटरीही संपली असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. व्यापारी, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, महावितरणकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यात काम करावे लागत असल्याने दुरुस्तीच्या कामात अडथळे येत आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी वरिष्ठांकडे करण्यात आल्याची माहिती महावितरणचे अधिकारी वाघ यांनी दिली.
नागरिकांनी संबंधित विभागांनी समन्वय साधून धोकादायक झाडांच्या फांद्यांची तातडीने छाटणी करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)