
नाशिक, 23 जुलै (हिं.स.)। गंगापूर धरणाच्या वरच्या भागात झालेल्या पावसामुळे धरणातून 12 हजार 600 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून शहर परिसरातील पावसामुळे गोदावरी नदीवरील होळकर पुलाजवळून सध्या 19 हजार 79 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यात आज वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पोलिस, महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्री. प्रसाद बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले की, त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कश्यपी धरण 71 टक्के, गौतमी गोदावरी धरण 90 टक्के भरल्याने गंगापूर धरणात पाण्याची आवक वाढली आहे. गंगापूर धरण 97 टक्के भरले असून या धरणातून नदी पात्रात 12 हजार 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याबरोबरच नदी, नाले दुथडी वाहत असल्याने सध्या होळकर पुलाजवळ 19 हजार 79 क्युसेक या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सायंकाळी पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी. याबरोबरच महानगरपालिका, पोलिस दल सतर्क झाले आहे. सराफ बाजार परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सायखेडा, चांदोरी परिसरात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
गोदावरी नदीतून 62 हजार क्यूसेक पाणी विसर्गाचा उच्चांक आहे. 2008 मध्ये 42 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग होता. सध्या तशी परिस्थिती नाही. त्र्यंबकेश्वर तालुक्यात मागील २४ तासांत १९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर मालेगावला गिरणा नदी काठावरील १६ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पाऊस आणि वाऱ्यामुळे त्र्यंबकेश्वर येथे पत्रा उडाल्याने आठ पर्यटकांपैकी एक जण जखमी झाला. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. महाराष्ट्र -गुजरात सीमेवर एक बस नदीपात्रात अडकली होती. सर्व प्रवाश्यांची सुटका करण्यात आली असून ते सुरक्षित आहेत. याबाबत जिल्हा प्रशासन बलसाड (गुजराथ) प्रशासनाच्या संपर्कात आहे.
आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा आपत्ती निवारण कक्ष स्थापन केला आहे. नागरिकांनी धोकेदायक ठिकाणी जाऊ नये किंवा नदी काठावर जाऊ नये. नागरिकांनी घाबरून न जाता पोलिस, महानगरपालिका, अग्निशमन दलाच्या सूचनांचे पालन करावे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये पुरेसा औषधांचा साठा, सर्प दंश प्रतिबंधक लशीचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. वीज वितरण कंपनीलाही सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज दुपारी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह उपमहापौरांनी नदी परिसराची पाहणी केली असून यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सात रस्ते बंद असून ते पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV