
सोलापूर, 23 जुलै (हिं.स.)।
सोलापूरच्या सोशल मीडिया आणि रील विश्वात 'बाबू भैया' या नावाने लोकप्रिय असलेले कंटेंट क्रिएटर गौरव शहा यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे सोलापूरच्या डिजिटल विश्वावर शोककळा पसरली असून चाहत्यांसह विविध क्षेत्रांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
गौरव शहा यांनी 'बाबू भैया' या नावाने सोशल मीडियावर वेगळी ओळख निर्माण केली होती. सोलापूर आणि परिसरातील अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांसाठी त्यांनी कल्पक आणि आकर्षक जाहिरातींचे रील्स तयार केले. त्यांच्या व्हिडिओंमध्ये मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेशालाही महत्त्वाचे स्थान असे. विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करणारे व्हिडिओ तयार करून त्यांनी समाजाप्रती असलेली आपली बांधिलकीही जपली.
रील क्षेत्रात काम करणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी ते प्रेरणास्थान होते. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांना मार्गदर्शन करणे आणि एकत्रितपणे सर्जनशील काम करण्यासाठी प्रोत्साहन देणे, हा त्यांचा स्वभाव अनेकांच्या मनात घर करून गेला होता.
गौरव शहा यांच्या निधनामुळे सोलापूरच्या डिजिटल आणि रील क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. आपल्या सहज अभिनयशैली, विनोदी सादरीकरण आणि आपुलकीच्या स्वभावामुळे त्यांनी अल्पावधीत मोठा चाहतावर्ग निर्माण केला होता. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याला उजाळा दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड