रत्नागिरी : तीन महिन्यांचे रास्त धान्य एकाच महिन्यात देण्यास धान्य दुकानदारांचा विरोध
रत्नागिरी, 23 जुलै (हिं.स.) ।राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांचे धान्य एकत्र म्हणजेच आगाऊ उचल करून वितरित करण्याचे आदेश केंद्र व राज्य सरकारकडून दिले आहेत. या निर्णयाला रास्त धान्य दुकानदारांनी विरोध केला आहे.
रत्नागिरी : तीन महिन्यांचे रास्त धान्य एकाच महिन्यात देण्यास धान्य दुकानदारांचा विरोध


रत्नागिरी, 23 जुलै (हिं.स.) ।राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांचे धान्य एकत्र म्हणजेच आगाऊ उचल करून वितरित करण्याचे आदेश केंद्र व राज्य सरकारकडून दिले आहेत. या निर्णयाला रास्त धान्य दुकानदारांनी विरोध केला आहे.

तीन महिन्यांचे धान्य एकाच महिन्यात देण्याच्या निर्णयामुळे रेशन धान्य दुकानदार, वाहतूकदार आणि सर्वसामान्य लाभार्थी शिधापत्रिकाधारकांसमोर अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेली दरमहा म्हणजेच मासिक धान्यवाटपाची व्यवस्थाच पूर्ववत सुरू ठेवावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसिन चालक-मालक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पावसाळ्याचे दिवस असल्याने तीन महिन्यांचा धान्यसाठा एकत्र ठेवल्यास धान्य किडणे व खराब होण्याचा मोठा धोका निर्माण होत असून तालुकास्तरीय शासकीय धान्य गोदामे तसेच रेशन दुकानदारांची दुकाने केवळ एका महिन्याच्या धान्य साठवणूक क्षमतेनुसार तयार केली असल्यामुळे तीन महिन्यांचे धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी रेशन दुकानदारांकडे पुरेशी जागा उपलब्ध नाही.

केवळ साठवणुकीचाच नव्हे तर वाहतूक आणि तांत्रिक अडचणीसुद्धा उद्भवणार असून एफसीआय डेपोमधून धान्य उचलणाऱ्या कंत्राटदारांकडे एकाच वेळी तीन महिन्यांचा साठा वाहून नेण्यासाठी पुरेशी वाहने उपलब्ध नाहीत आणि पीडीएस सिस्टीम तसेच ई-पॉस मशिन दरमहा वाटपाच्या हिशेबाने सेट केलेले असल्याने एकत्र वाटप करताना तांत्रिक अडचणी उद्भवून पातळीवर मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या अनेक शिधापत्रिकाधारकांना तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होणार नाही. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम कायद्याच्या नियमांनुसार अन्नधान्य वाटप हे लाभार्थी व दुकानदारांसाठी व्यावहारिक आणि सोयीचे असणे बंधनकारक असताना प्रशासनाने हा नियम लादल्यास संपूर्ण वितरण व्यवस्था विस्कळीत होईल.

या सर्व व्यावहारिक समस्यांचा गांभीर्याने विचार करून दरमहा धान्यवाटपाची पद्धत कायम ठेवावी, अशी विनंती संघाचे अध्यक्ष अशोक कदम, उपाध्यक्ष विकास चव्हाण, सचिव प्रकाश, नितीन कांबळे व इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande