
छत्रपती संभाजीनगर, 23 जुलै, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेतून पहिल्या टप्प्यातील पाणीपुरवठ्यास शुभारंभ झाला. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शहराच्या पाणीप्रश्नाच्या कायमस्वरूपी समाधानासाठी सातत्याने पाठपुरावा करून सुमारे ₹२,७४० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. त्या ऐतिहासिक प्रयत्नांचे हे महत्त्वपूर्ण यश प्रत्यक्षात साकार झाले आहे.
नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत एन-५ येथील जलकुंभात पाणी सोडण्यात आले. यानिमित्त सिडको परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात उपस्थित राहून आनंदोत्सव साजरा केला. ही केवळ सुरुवात असून पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. पुढील टप्प्यांमध्ये संपूर्ण शहरात टप्प्याटप्प्याने या योजनेद्वारे नियमित आणि मुबलक पाणीपुरवठा सुरू होणार आहे. सुरळीत, शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. छत्रपती संभाजीनगरचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याच्या दिशेने ही ऐतिहासिक वाटचाल अधिक वेगाने सुरू आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis