दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ जिंतूर बंद
परभणी, 23 जुलै, (हिं.स.)। दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. २३) जिंतूर शहरात विविध पक्ष व संघटनांच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांमार्फ
दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ जिंतूर बंद


परभणी, 23 जुलै, (हिं.स.)। दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. २३) जिंतूर शहरात विविध पक्ष व संघटनांच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात एकत्र येत आंदोलन केले. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या आंदोलनात सतीश वाकळे, शरद चव्हाण, विकास मोरे, गंगाप्रसाद घुगे,माजी सैनिक बालाजी शिंदे, अनिल गाडेकर, गणेश काकडे, शेख इर्शाद पाशा,यांच्यासह नगरसेवक शेख इस्माईल, अकबर कुरेशी, सय्यद फेरोज,आणि विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलकांनी शहरातील मुख्य बाजारपेठेत फेरी काढत घोषणाबाजी केली. त्यानंतर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी विविध नेत्यांनी आपली मनोगते व्यक्त करून केंद्र सरकार व दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर टीका केली.तहसीलदार शीतल कच्छवे यांना देण्यात आलेल्या निवेदनात, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, विद्यार्थी व विद्यार्थिनींवर लाठीचार्ज करणाऱ्या तसेच गणवेशाविना कारवाई करणाऱ्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करावी, नीट पेपरफुटी प्रकरणामुळे बाधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर जिंतूर शहरातील बाजारपेठेत संमिश्र प्रतिसाद दिसून आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक नामदेव रेड्डी यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परभणी स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार जिया खान पठाण यांच्यासह पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande