
आ. राजेश विटेकर यांचे अधीक्षक अभियंत्यांना निवेदन
परभणी, 23 जुलै (हिं.स.)।
मानवत तालुक्यातील रत्नापूर येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 (सध्याचा क्र. 61) वर सुरू करण्यात आलेल्या नव्या टोलनाक्यावरून प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या तसेच शेतीमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांना टोल शुल्कातून माफी देण्याची मागणी आमदार राजेश विटेकर यांनी संबंधित अधीक्षक अभियंत्यांकडे केली आहे. रत्नापूर टोलनाका सुरू झाल्यानंतर मानवत व पाथरी तालुक्यातील नागरिकांना दैनंदिन कामानिमित्त वारंवार या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. तसेच शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतीमालाची खरेदी-विक्री करण्यासाठी ट्रॅक्टर, ऑटो, ट्रक, टेम्पो आदी वाहनांद्वारे वाहतूक करावी लागते. त्यामुळे वारंवार टोल भरावा लागत असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. टोलनाक्याच्या 20 किलोमीटर परिघातील स्थानिक नागरिकांच्या सर्व वाहनांना तसेच शेतीमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांना टोल शुल्कातून सवलत किंवा संपूर्ण माफी देण्यात यावी, अशी मागणी आमदार विटेकर यांनी केली आहे. स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांची आर्थिक अडवणूक होऊ नये, त्यांच्या दैनंदिन प्रवासात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि शेतीमालाच्या वाहतुकीवर अतिरिक्त खर्चाचा बोजा पडू नये, यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही आमदार राजेश विटेकर यांनी व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis