
सोलापूर, 23 जुलै (हिं.स.)। दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या कथित लाठीमार व अश्रुधूराचा वापर केल्याच्या घटनेचा निषेध करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी मंगळवेढा बंदचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन सहायक पोलीस निरीक्षक कुमार ढेरे यांना देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढ्यातही बंदचे आवाहन करण्यात आले होते. दामाजी चौकातील श्री संत दामाजी पंत यांच्या पुतळ्यास तालुकाध्यक्ष अशोक माने व शशिकांत रोकडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर केंद्र सरकार आणि पोलिस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत शहरातून मोर्चा काढण्यात आला.
यावेळी सादर करण्यात आलेल्या निवेदनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, आंदोलकांवर कारवाई करणाऱ्या दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, आंदोलकांशी संवाद साधून प्रश्नांचा मार्ग काढावा, जखमी आंदोलकांना शासकीय मदत द्यावी तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
दरम्यान, बंदबाबतची माहिती अनेक व्यापाऱ्यांना वेळेत मिळाली नसल्याने बहुतांश दुकाने नियमित सुरू होती. त्यामुळे शहरात आलेल्या नागरिकांना काही ठिकाणी संभ्रम व किरकोळ गैरसोयीचा सामना करावा लागला. बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड