कौंडण्यपूरहून निघालेली रुक्मिणी मातेची पालखी पंढरपुरात दाखल
अमरावती, २३ जुलै (हिं.स.) : श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून १९ जून रोजी आषाढी पायी वारीसाठी प्रस्थान केलेली रुक्मिणी मातेची पालखी ३३ दिवसांचा प्रवास पूर्ण करून बुधवारी (२२ जुलै) दुपारी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भक्तिमय वातावरणात दाखल झाली. गेल्या ४३२ व
श्री पांडुरंगाच्या नगरीमध्ये पोहोचली रुक्मिणी माता:पंढरपूर येथील मठात मातेच्या पालखीचे स्वागत


अमरावती, २३ जुलै (हिं.स.) : श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून १९ जून रोजी आषाढी पायी वारीसाठी प्रस्थान केलेली रुक्मिणी मातेची पालखी ३३ दिवसांचा प्रवास पूर्ण करून बुधवारी (२२ जुलै) दुपारी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भक्तिमय वातावरणात दाखल झाली. गेल्या ४३२ वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या या ऐतिहासिक परंपरेचे यंदाही भावपूर्ण दर्शन घडले.

दरवर्षीप्रमाणे रुक्मिणी मातेची पालखी प्रथम पंढरपूरातील रुक्मिणी मठात विसावली. त्यानंतर श्री विठ्ठलाच्या भेटीचा सोहळा पार पडला. माता रुक्मिणी आणि श्री विठ्ठल यांच्या मिलनाचा हा सोहळा वारकरी संप्रदायासाठी अत्यंत भावनिक आणि भक्तिभावाने ओतप्रोत भरलेला मानला जातो.

पालखी पंढरपुरात पोहोचताच रुक्मिणी मठ परिसरात फटाक्यांची आतषबाजी, फुलांचा वर्षाव, रुक्मिणी मातेचा जयघोष, वारकऱ्यांचे औक्षण आणि प्रसाद वितरण अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मंदिर परिसर आकर्षक फुलांची सजावट आणि रांगोळ्यांनी सुशोभित करण्यात आला होता.

या स्वागत सोहळ्यास श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानाचे विश्वस्त हिम्मत टाकोने, अशोक पवार, अकोला येथील रवींद्र अंधारे, संस्थानचे सचिव सदानंद साधू, दिंडी चालक पंकज महाराज महल्ले, दिंडी प्रमुख सुरेश चव्हाण, विणेकरी विठोबा बागडे यांच्यासह अनेक वारकरी उपस्थित होते.

यावेळी सेवावृत्त मुख्याध्यापिका शांता दोंडगे, कुसूम पवार, सेवावृत्त पीएसआय प्रल्हाद पवार, सूर्यकांत पवार, बाबूलाल मोरे तसेच महिला-पुरुष वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रुक्मिणी मातेच्या पालखीचे जल्लोषात स्वागत केले.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande