
सोलापूर, 23 जुलै (हिं.स.)।
नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना आणि दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)च्या वतीने गुरुवारी (दि. २३ जुलै) जिल्हा परिषद, पूनम गेट येथे आक्रमक निदर्शने करण्यात आली.या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट परीक्षेतील गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. जोपर्यंत त्यांचा राजीनामा होत नाही आणि शिक्षण व्यवस्था पारदर्शक व विद्यार्थीहिताची होत नाही, तोपर्यंत हा संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला.आडम मास्तर म्हणाले की, नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि त्यानंतर घडलेल्या दुर्दैवी घटनांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांवर लाठीमार करणे, अश्रुधूराच्या नळकांड्या फोडणे आणि आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणे ही लोकशाहीवरील गदा आहे. अशा दडपशाहीचा देशातील जनतेकडून तीव्र निषेध केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, बाबासाहेबांच्या देशात जात-धर्माचे राजकारण चालणार नाही, रोजी-रोटी देऊ न शकणारे सरकार बदललेच पाहिजे, शिक्षण आमच्या हक्काचे आहे, कुणाच्या बापाचे नाही, नीटच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा, मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची मदत द्या अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.यावेळी प्रजा नाट्य मंडळ कलापथकाचे शाहीर प्रशांत म्याकल, अरुण सामल आणि चंद्रकांत मंजुळकर यांनी क्रांतिकारी गीतांच्या माध्यमातून आंदोलनाला सांस्कृतिक बळ दिले.या आंदोलनात राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. एम. एच. शेख (सर), माकप जिल्हा सचिव कॉ. युसूफ शेख (मेजर), जनवादी महिला संघटनेच्या राज्य अध्यक्षा नसीमा शेख, ॲड. अनिल वासम, दत्ता चव्हाण, सुनंदा बल्ला, शेंवन्ता देशमुख उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड