
छत्रपती संभाजीनगर, 23 जुलै (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथील गुलमंडी रोडवरील ‘उत्तम उपहार गृह’मध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी गंभीर तडजोड होत असल्याचा धक्कादायक प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) धडक कारवाईत उघड झाला.
‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत झालेल्या तपासणीत पुनर्वापराचे खाद्यतेल व वनस्पती तूप, अस्वच्छ स्वयंपाकघर, कीटकांचा वावर, भिंतींवरील बुरशी, उघड्यावर अन्नपदार्थांची तयारी, कर्मचाऱ्यांकडे वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्रांचा अभाव आणि अन्नसुरक्षा नियमांचे अनेक गंभीर उल्लंघन आढळले. या पार्श्वभूमीवर एफडीएने आस्थापन्याचा परवाना तात्काळ निलंबित करून उपहारगृह बंद केले. जप्त केलेल्या तेल व वनस्पती तुपाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून पुढील कठोर कायदेशीर कारवाई सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis