
रत्नागिरी, 23 जुलै (हिं.स.) दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईच्या निषेधार्थ आज रत्नागिरी शहरात हजारो विद्यार्थी, नागरिक, विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना आणि नोकरदारांनी मोर्चा काढला.
“शिक्षण वाचवा, लोकशाही वाचवा”, “हुकूमशाही सरकारचा निषेध असो”, “विद्यार्थ्यांवरील दडपशाही बंद करा”, “सरकार होश में आओ”, अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर रात्रीच्या अंधारात पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचार मंचाच्या पुढाकाराने हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या धोरणांविरोधात आणि २३ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांबाबत सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
सकाळी मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या विद्यार्थी, युवक, नागरिक आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
आंदोलकांनी सरकारवर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करणे ही हुकूमशाहीची प्रवृत्ती असल्याची टीका केली. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
मोर्चात सर्व विद्यार्थी संघटना, विविध सामाजिक संघटना, नोकरदार वर्ग तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पक्षभेद आणि मतभेद बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी एकत्र येण्याचे आवाहनही करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी