
लातूर, 23 जुलै (हिं.स.)।
लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंबेजोगाई रोडवरील मयुरा लॉजमध्ये सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर मध्यरात्री धाड टाकून १२ जुगाऱ्यांना रंगेहात पकडले. या कारवाईत रोख रक्कम, महागडे मोबाईल, जुगाराचे पत्ते असा एकूण ३ लाख ६३ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, मयुरा लॉज, अंबेजोगाई रोड, लातूर येथील तिसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक ३०६ मध्ये काही इसम मोठ्या प्रमाणात तिर्रट नावाचा जुगार खेळत आहेत. सदरची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून परवानगी रात्री सुमारे १०.५० वाजता छापा टाकण्यात आला.
छाप्यावेळी १२ जण दोन वेगवेगळ्या रिंगणात बसून पैशांचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम, विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल तसेच जुगाराचे पत्ते असा ₹३,६३,०५० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .
कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सॅमसंग फोल्ड-६, वनप्लस, विवो, रेडमी, ओप्पो, टेक्नो आदी कंपन्यांचे मोबाईल फोन तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे पत्ते यांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलीस पोलीस ठाणे शिवाजीनगर, लातूर येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे,पोलीस अंमलदार युवराज गिरी, प्रदीप स्वामी, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, काकासाहेब बोचरे यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis