अमरावतीत सिमेंटच्या कारखान्यावर धाड
अमरावती, 23 जुलै (हिं.स.) अंजनगावबारी ते माजरी म्हसला मार्गावर असणाऱ्या शेतशिवारातील एका कुक्कुटपालन शेडवर बडनेरा पोलिसांनी धाड टाकून बनावट सिमेंट कारखान्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका नामांकित कंपनीच्या नावाने तयार करण्यात आलेल्या बनावट सिमें
अमरावतीत सिमेंटच्या कारखान्यावर धाड


अमरावती, 23 जुलै (हिं.स.)

अंजनगावबारी ते माजरी म्हसला मार्गावर असणाऱ्या शेतशिवारातील एका कुक्कुटपालन शेडवर बडनेरा पोलिसांनी धाड टाकून बनावट सिमेंट कारखान्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका नामांकित कंपनीच्या नावाने तयार करण्यात आलेल्या बनावट सिमेंटच्या बँगा, साहित्य व अन्य उपकरणांसह एकूण ३ लाख ४३ हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी बडनेरातील गवळीपुरा येथे राहणाऱ्या एका आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच कॉपीराइट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस तक्रारीनुसार, फिर्यादी नितीन नारायण ठाकरे (४८), रा. राजहर्ष कॉलनी, भोपाळ, हे सिमेंट कंपनीचे प्रतिनिधी असून, त्यांना कंपनीकडून माहिती मिळाली होती की, अंजनगाव बारी ते माजली म्हसला मार्गावरील एका शेतात निकृष्ट दर्जाचे बनावट सिमेंट तयार करून ते विक्री केले जात आहे. या माहितीवरून त्यांच्यासह बडनेरा पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली असता, त्या ठिकाणी बनावट सिमेंटने भरलेले पोते आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी विविध प्रकारच्या सिमेंटने भरलेले पोते, रिकाम्या बॅगा, लोखंडी कुप्पी, घमेली व फावडे असा एकुण ३ लाख ४३ हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी हा एका सिमेंट कंपनीचा लोगो वापरून ग्राहकांना ते सिमेंट विक्री करून फसवणूक करीत असल्याचे उघड झाल्याने, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणात नितीन ठाकरे यांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी आरोपी शेख युसुफ शेख बब्बू (४०), रा. गवळीपुरा, नवीवस्ती, बडनेरा याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करीत आहे.---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande