
वर्धा, २३ जुलै (हिं.स.) : कानगाव-गाडेगाव परिसरात गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली असून वायगाव-राळेगाव हा महत्त्वाचा मार्ग चिखलमय आणि खड्डेमय झाल्याने राज्य परिवहन महामंडळाने या मार्गावरील बससेवा तात्पुरती बंद केली आहे.
बससेवा बंद झाल्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याची बिकट अवस्था लक्षात घेऊन काही बसफेऱ्या मनसावळीमार्गे वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासाचे अंतर वाढले असून वेळ आणि खर्च दोन्ही वाढले आहेत.
कानगाव, वायगाव, अल्लीपूर, वडनेर, मोझरी (शेकापूर) आणि परिसरातील नागरिकांना आता खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. विशेषतः शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, बँक कर्मचारी तसेच शासकीय व खासगी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना देवळीमार्गे प्रवास करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
वायगाव ते कात्री फाटा रस्त्याची अवस्था अत्यंत धोकादायक झाली आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे, चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून या मार्गावर सातत्याने अपघात घडत आहेत. मोठी दुर्घटना होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, पावसाने मागील १५ दिवस दडी मारल्याने संकटात सापडलेल्या खरीप पिकांना या संततधार पावसामुळे दिलासा मिळाला आहे. सोयाबीन, कापूस, तूर आणि इतर पिकांना नवसंजीवनी मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शेतातील ओलावा वाढल्याने पिकांची वाढ चांगली होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
शेतीसाठी लाभदायक ठरणारा हा पाऊस ग्रामीण भागातील रस्ते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि दैनंदिन जीवनासाठी मात्र आव्हान ठरत आहे. संबंधित विभागाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी