
सोलापूर, 23 जुलै (हिं.स.)। आसरा चौक परिसरातील एसबी प्लाझा आयकॉन या निवासी इमारतीत अतिसाराचा उद्रेक झाल्याने एकाच वेळी सुमारे ४० रहिवासी बाधित झाले आहेत. बाधितांपैकी बहुतांश जण शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून आयेशा शेख (वय ४६) यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना यशोधरा हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तत्काळ सर्वेक्षण सुरू केले. आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी इमारतीतील पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. अहवाल आल्यानंतर आजाराचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, इमारतीतील रहिवाशांनी दूषित मलवाहिनीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत ती तातडीने बदलून देण्याची मागणी केली आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याचा दावा रहिवाशांनी केला.
या प्रकरणी महापालिकेचे कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितले की, संबंधित झोनमार्फत ड्रेनेज लाईनची तपासणी सुरू आहे. ड्रेनेजचे पाणी बोअरमध्ये मिसळत असल्याचा रहिवाशांचा संशय तपासला जात असून ड्रेनेज लाईनची स्वच्छताही करण्यात येत आहे.
डॉ. राखी माने यांनी सांगितले की, संबंधित इमारतीला महापालिकेचे पाणीपुरवठा होत नसून तेथे तीन खासगी बोअर आहेत. या बोअरच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिसळल्याचा प्राथमिक संशय आहे. त्यामुळे काल आणि आज पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड