वीरगव्हाण जलाशयामुळे १५० शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ
अमरावती, २३ जुलै (हिं.स.) : शासनाच्या ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत तिवसा तालुक्यातील भिवापूर ग्रामपंचायत हद्दीतील वीरगव्हाण येथे उभारण्यात आलेला जलसंधारण प्रकल्प ग्रामीण विकासाचा आदर्श ठरत आहे. या जलाशयामुळे सुमारे १५० शेतकऱ्यांना सिं
गाळयुक्त शिवारने बदलले वीरगव्हाणचे चित्र:जिल्हा नियाेजन समितीच्या खर्चातून केलेल्या सोयीमुळे 150 शेतकऱ्यांना फायदा


अमरावती, २३ जुलै (हिं.स.) : शासनाच्या ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत तिवसा तालुक्यातील भिवापूर ग्रामपंचायत हद्दीतील वीरगव्हाण येथे उभारण्यात आलेला जलसंधारण प्रकल्प ग्रामीण विकासाचा आदर्श ठरत आहे. या जलाशयामुळे सुमारे १५० शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली असून २०० हेक्टर शेतीला हक्काचे पाणी मिळाल्याने कृषी उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे.

या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आला. पालकमंत्री तथा डीपीसी अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी आणि जिल्हा जलसंधारण अधिकारी सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारण्यात आला. यामध्ये ग्रामपंचायत, सरपंच आणि ग्रामस्थांनीही सक्रिय सहकार्य केले.

प्रारंभी ‘गाळमुक्त धरण’ योजनेअंतर्गत तलावाचे खोलीकरण करण्यात आले. त्यानंतर जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून तलावाचा पाळ आणि सांडवा दुरुस्त करण्यात आला. या कामामुळे जलाशयाची पाणी साठवण क्षमता वाढली असून परिसरातील शेतीला वर्षभर पाण्याचा आधार मिळाला आहे.

तलावातून काढण्यात आलेला सुपीक गाळ १५० शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये टाकण्यात आल्याने सुमारे १०० हेक्टर जमिनीचा पोत सुधारला असून भूजल पातळीतही वाढ झाली आहे. याचा परिणाम म्हणून यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी ४ हजार क्विंटल गव्हाचे विक्रमी उत्पादन घेतले असून त्यांच्या उत्पन्नात मोठी भर पडली आहे.

प्रशासनाचे नियोजन आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून साकारलेला वीरगव्हाण जलसंधारण प्रकल्प जिल्ह्यातील इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. या जलाशयामुळे गावातील सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात मार्गी लागला असून ग्रामीण जलव्यवस्थापनाचा हा एक यशस्वी नमुना मानला जात आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande