
सोलापूर, 23 जुलै (हिं.स.)।सोलापूरकरांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या आयटी पार्कसाठी होटगी येथील पाटबंधारे विभागाची जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला विनामोबदला देण्याचे आदेश निघाले. या आदेशामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्याने आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.
सोलापूरकरिता होटगी येथे आयटी पार्क करण्याचा निर्णय झाल्यानंतर या आयटी पार्कला जागा मिळवून देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी शासन दरबारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. मुंबई येथे झालेल्या बैठकांमध्येही आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरच्या आयटी पार्कचा विषय उचलून धरला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच सोलापूरच्या आयटी पार्कसाठी जलसंपदा खात्याची जमीन विना मोबदला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे वर्ग करण्याचा शब्द अधिवेशन काळात झालेल्या भेटीप्रसंगी दिला होता. पाटबंधारे विभागाने आदेश काढून होटगी येथील लघु पाटबंधारे तलावाची गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर जागा आयटी पार्कसाठी विना मोबदला हस्तांतरित करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबतचे पत्र लघुपाटबंधारे विभागाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला दिले आहे.
होटगी येथील जागा हस्तांतरणाचा प्रश्न अनेक दिवसांपासून रखडला होता. त्यामुळे आमदार देवेंद्र कोठे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडेही याबाबत पाठपुरावा केला होता. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस असल्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्ह्यात येण्यापूर्वी याबाबतचे त्वरित आदेश काढण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांनी संबंधितांना दिल्या होत्या. त्यानुसार याबाबतचा आदेश निघाला. झालेल्या या निर्णयामुळे सोलापुरातील आयटी पार्क होटगी येथेच होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
----------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड