
कोल्हापूर, 23 जुलै (हिं.स.)। कोल्हापूर महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज आणि अमेरिकेतील 'रोटरी क्लब ऑफ मायामी एअरपोर्ट' यांच्या आंतरराष्ट्रीय सहकार्याने सुमारे ३४ लाख रुपये खर्चाच्या अत्याधुनिक कलर डॉपलर सोनोग्राफी मशीन व सुसज्ज रूमचे लोकार्पण अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. महापौर सौ. रूपाराणी निकम व मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
या हाय-टेक सोनोग्राफी मशीनमुळे विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आणि गरजू रुग्णांना अत्यंत अल्प दरात दर्जेदार व अचूक निदान सुविधा उपलब्ध होणार आहे. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजच्या तत्कालीन अध्यक्षा रोटेरियन पूजा गांधी, सचिव श्रुती मंत्री, खजिनदार प्रशांत मेहता आणि प्रकल्प प्रमुख डॉ. अभिजित वज्रमुष्टी व प्रसाद मंत्री यांच्या विशेष पुढाकाराने हा प्रकल्प साकारला आहे. महापौर सौ. रूपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी रोटरी क्लबच्या या सामाजिक उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. भविष्यातही महानगरपालिका आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून असे अनेक लोकहिताचे उपक्रम राबविले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान माजी प्रांतपाल शरद पै, अरुण भंडारे तसेच मशीनचे पुरवठादार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सार्वजनिक आरोग्यसेवेला नवी दिशा देणारा हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे!
यावेळी रोटरी क्लबचे पदाधिकारी, मनपाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar