वंबआ मित्र पक्षाच्या माजलगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
बीड, 23 जुलै (हिं.स.)। दिल्ली येथील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपविरोधी मित्रपक्ष व विविध सामाजिक संघटनांना महाराष्ट्
बंदला प्रतिसाद


बीड, 23 जुलै (हिं.स.)।

दिल्ली येथील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपविरोधी मित्रपक्ष व विविध सामाजिक संघटनांना महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत बुधवारी माजलगाव शहरात व्यापारी, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. सकाळपासूनच शहरातील व्यापारी पेठा शांत दिसून आल्या. बहुतांश दुकाने स्वयंस्फूर्तीन बंद ठेवण्यात आली होती. बंदच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीसह मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी शहरातून रॅली काढत व्यापारी व नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला.

शहरातील संभाजी चौक, शिवाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, चुन्नुमा चौक, हनुमान चौक, जुना मोंढा यासह प्रमुख व्यापारी भागांमध्ये दिवसभर शुकशुकाट पाहायला मिळाला. किरकोळ व घाऊक बाजारपेठांतील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीन दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदविला. या महाराष्ट्र बंदमध्ये वंचित बहुजन आघाडी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप), संभाजी ब्रिगेड, रिपब्लिकन सेना, बहुजन समाज पक्ष (बसपा), शेतकरी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यासह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या संदर्भात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला होता आणि माजलगावकरांनी दिलेला प्रतिसाद हा लोकशाही मार्गाने व्यक्त केलेल्या जनभावनेचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. बंद यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व राजकीय पक्ष, मित्रपक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी बांधव, नागरिक आणि कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande