
यवतमाळ 23 जुलै (हिं.स.)
सर्वच विभागांचा सखोल आढावा, झेडपीच्या कारभारात 'समन्वया'चा मंत्र
गेल्या चार वर्षांपासून प्रशासकराज अनुभवणाऱ्या जिल्हा परिषदेत ग्रामीण माणसांना कोणीही विचारेनासे झाले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांशिवाय येथे फारशी वर्दळही दिसून येत नाही. मात्र आता प्रभारी सीईओंनी सर्वच विभाग प्रमुखांची संयुक्त बैठक घेऊन त्यांना 'समन्वया'चा मंत्र दिला आहे. ग्रामीण भागातील समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश दिले आहेत. केवळ एचओडीच नव्हेतर जिल्ह्यातील सोळाही पंचायत समित्यांना लोकाभिमुख कारभाराची सूचना करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांची नुकतीच गोंदिया जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यानंतर अतिरिक्त सीईओ संतोष धोत्रे यांच्याकडे जिल्हा परिषद सीईओ पदाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी आणि सीईओ नसतानाही जिल्हा परिषदेचा कारभार सुरळीत चालविण्याची जबाबदारी खांद्यावर येताच धोत्रे 'अॅक्टिव्ह मोड' वर आले आहेत. त्यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात समन्वय सभा बोलावली. सर्व एचओडी, डीआरडी प्रकल्प संचालक, सोळाही पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, पंचायत समिती स्तरावरचे सर्व खातेप्रमुख अशा सर्वांना एकत्र बसवून त्यांनी 'समन्वया'ने कारभार हाकण्याचा मंत्र दिला. दिवसभर चाललेल्या या सभेत ग्रामीण विकास यंत्रणा, पंचायत विभाग, बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, सिंचन विभाग, स्वच्छ भारत मिशन आदींचा त्यांनी सकाळच्या सत्रात आढावा घेतला. तर दुपारच्या सत्रात सामान्य प्रशासन, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण, पशुसंवर्धन विभागाच्या कामांचा आढावा घेतला. प्रशासक कार्यकाळात यापूर्वी येऊन गेलेल्या आयएएस सीईओंनीही अशी सर्वसमावेशक बैठक घेतली नव्हती, हे विशेष. परंतु, या 'समन्वया'च्या मंत्रातून प्रशासनाने ग्रामीण माणसांशी 'सलोखा' ठेवावा आणि त्यांना 'सहकार्य' करावे, एवढीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे
वित्त आयोगाच्या निधीचे काय झाले?
समन्वय सभेमध्ये प्रभारी सीईओ संतोष धोत्रे यांनी वित्त आयोगाच्या निधीबाबत सखोल आढावा घेतला. १५ वित्त आयोगातून जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती स्तरावर प्राप्त झालेल्या १० टक्के निधीचा विनियोग कसा झाला, त्यातून कोणती कामे झाले, यावर माहिती घेण्यात आली. तसेच ग्रामपंचायत स्तरावर आलेल्या निधीतून झालेली कामे व त्या निधीच्या उपयोगीता प्रमाणपत्रांवर या सभेत 'फोकस' करण्यात आला.---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी