


रायगड, 23 जुलै (हिं.स.)I दिल्लीतील जंतरमंतर येथे 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी बहुजन नेते प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला कर्जत तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कर्जत, नेरळ, कडाव, कशेळे आणि कळंब येथील प्रमुख बाजारपेठा दिवसभर कडकडीत बंद राहिल्या.
दिल्लीतील घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा तसेच काही विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा निषेध व्यक्त करत शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला होता.
बंदला तालुक्यातील व्यापारी, व्यावसायिक, नागरिक, रिक्षाचालक, हातगाडी व्यावसायिक तसेच विविध सामाजिक, विद्यार्थी आणि राजकीय संघटनांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला. त्यामुळे बहुतांश बाजारपेठांमधील दुकाने बंद राहिली असून व्यवहारांवर परिणाम झाला.
कर्जत तालुक्यात बंद शांततापूर्ण वातावरणात पार पडला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक बंदोबस्त ठेवला होता. नागरिकांनीही हा बंद विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांसाठी असल्याचे सांगत सहकार्य केले.
या बंदला वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI), आझाद समाज पार्टी, बहुजन समाज पार्टी, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आदिवासी समाज संघटना, वाल्मीकी समाज संघटना, भारतीय बौद्ध महासभा तसेच कर्जत, नेरळ, कडाव आणि कशेळे येथील व्यापारी संघटना, कर्जत प्रेस असोसिएशन, रिक्षा संघटना आणि हातगाडी युनियन यांनी जाहीर पाठिंबा दिला होता.
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी समाजातील विविध घटकांनी एकत्र येत दिलेला हा प्रतिसाद शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या प्रश्नाला अधिक बळ देणारा ठरल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)