
लातूर, 23 जुलै, (हिं.स.)। बेलकुंड येथील अंगणवाडी केंद्रास जिल्हा परिषद सदस्या सईताई पृथ्वीराज गोरे यांनी सदिच्छा भेट देत केंद्रातील विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी त्यांनी बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची प्रत्यक्ष तपासणी करून त्याची गुणवत्ता, वितरण व्यवस्था तसेच केंद्रातील दैनंदिन कामकाजाची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांकडून जाणून घेतली.
भेटीदरम्यान अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्य, पोषण व शैक्षणिक नोंदींची पाहणी करत त्यांनी बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी केंद्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. पोषण, स्वच्छता आणि प्राथमिक शिक्षण या तीन घटकांवर विशेष भर देत प्रत्येक बालकापर्यंत दर्जेदार सेवा पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प व्यक्त केला.
या प्रसंगी पंचायत समिती सदस्य समाधान कांबळे, श्रीराम माने, चेअरमन संतोष हलकरे, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच बेलकुंड गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी सईताई गोरे यांचे स्वागत करत गावातील विविध विकासकामे व स्थानिक प्रश्नांबाबत चर्चा केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis