
सुमारे २ ते ३ हजार नागरिकांनी घेतला योजनांचा लाभ
यवतमाळ, २३ जुलै (हिं.स.) : शासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने महसूल विभागाच्या वतीने पोस्टल ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आलेल्या “छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराला” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महसूल विभागासह २२ विभागांनी एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध करून दिल्याने सुमारे २ ते ३ हजार नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेतला.
जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराच्या अध्यक्षस्थानी आमदार बाळासाहेब मांगुळकर होते. यावेळी नगराध्यक्षा डॉ. प्रियदर्शिनी उईके, उपाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नगरसेवक नितीन गिरी, बिपिन चौधरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी गोपाल देशपांडे यांनी प्रास्ताविकातून शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. शासनाच्या विविध सेवा नागरिकांना सहज उपलब्ध व्हाव्यात आणि लाभार्थ्यांना शासकीय कार्यालयांची वारंवार पायपीट करावी लागू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
शिबिरात विविध महसुली दाखले, प्रमाणपत्रे आणि शासकीय योजनांचे लाभ जागेवरच वितरित करण्यात आले. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
कृषी संवाद सत्रात प्रगतशील शेतकरी निलेश टाके यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेती, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि उत्पादनवाढीबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांनी पात्र नागरिकांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा वेळेत लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
या शिबिरात अनेक लाभ थेट लाभार्थ्यांच्या हाती देण्यात आले. त्यामध्ये योजनेचे धनादेश, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेची प्रमाणपत्रे, रमाई व प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभ, निवासी अतिक्रमण जमिनीचे ५० पट्टे, २० महिला बचत गटांना अर्थसहाय्य, ४१ स्मार्ट कार्ड, तसेच विद्यार्थ्यांना सायकली, दप्तर आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी