
सोलापूर, 23 जुलै, (हिं.स.)। पुणे जिल्ह्याच्या वरच्या भागात सुरू असलेल्या संततधार पावसाचा सकारात्मक परिणाम उजनी धरणाच्या पाणीसाठ्यावर दिसून येत आहे. धरणात सध्या १२ हजार ७९७ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून, वाढत्या साठ्याच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने ५ हजार ५७० क्युसेक विसर्ग कायम ठेवला आहे.
सध्या उजनी धरणाची पाणीपातळी ४९४.५२५ मीटर इतकी झाली असून, धरणातील एकूण पाणीसाठा ९२.४६ टीएमसी आहे. त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा २८.८० टीएमसी (५३.७५ टक्के) इतका झाला आहे. सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ होत असून, आगामी काही दिवसांत आवक कायम राहिल्यास साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दौंड परिसरातील भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा वेगही वाढला आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून धरणातील आवक आणि विसर्गावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
वरच्या धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास उजनी धरणातील पाण्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तसेच शेती सिंचनाच्या दृष्टीने धरणातील वाढता पाणीसाठा दिलासादायक मानला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड