
अमरावती, 23 जुलै (हिं.स.)
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विद्यार्थी आंदोलनाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करताना विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विरोध नसल्याचे सांगितले. मात्र, या आंदोलनाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न होत असून काहीजण त्यातून राजकीय पोळी शेकत असल्याचे त्यांनी म्हटले. विद्यार्थ्यांच्या भावना रास्त असून सरकार त्यांच्याशी सहमत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत कठोर भूमिका घेतली असून, पेपरफुटी प्रकरणात अत्यंत कडक पावले उचलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थी आणि युवक सरकारची भूमिका समजून घेतील व आंदोलनाला राजकीय स्वरूप येऊ देणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.कर्जमाफीबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यास सरकार कटिबद्ध आहे. आतापर्यंत ३५ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून उर्वरित लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचा लाभ दिला जाईल. तसेच शेतकऱ्यांना देण्यात येणारा प्रोत्साहन भत्ता सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात वितरित केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी