
जळगाव, 23 जुलै, (हिं.स.) जळगाव जिल्ह्यातील कापूस पिकांचे काढणीपश्चात होणारे नुकसान टाळण्यासाठी तसेच स्थानिक पातळीवर मूल्यवर्धनाला चालना देण्यासाठी कृषी विभागामार्फत 'कापूस उत्पादकता अभियान सन २०२६-२७' अंतर्गत स्थानिक पुढाकाराच्या घटकातून बायोचार युनिट व कॉटन श्रेडर यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात आले असून पात्र लाभार्थ्यांकडून महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
बायोचार युनिट अंतर्गत जमिनीतील कार्बनचे प्रमाण वाढवून सुपीकता वाढविणे तसेच कापूस पिकाच्या पऱ्हाट्यांचा वापर करून उत्पादकता वाढविणे हा उद्देश आहे. या घटकासाठी वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था पात्र असून प्रति युनिट रु. १०,००० किंवा खर्चाच्या ५० टक्के, यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येणार आहे. कॉटन श्रेडर घटकाचा समावेश कापूस उत्पादनातील यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान (SMAM) योजनेच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. या घटकासाठी वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रातील सहकारी संस्था पात्र आहेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ५० टक्के, कमाल रु. ०.७५ लाख प्रति युनिट, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४० टक्के, कमाल रु. ०.६० लाख प्रति युनिट अनुदान देय आहे. दोन्ही घटकांसाठी लाभार्थी निवड महाडीबीटी पोर्टलद्वारे 'प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS)' या तत्त्वावर करण्यात येणार आहे. तसेच हे अनुदान क्रेडिट-लिंक्ड बॅकेंडेड सबसिडी स्वरूपातील असल्यामुळे लाभार्थ्यांनी बँक कर्ज घेणे अनिवार्य आहे. एकाच बाबीसाठी दोन वेगवेगळ्या शासकीय योजनांतून अनुदानाचा लाभ घेता येणार नाही. इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी बायोचार युनिट व कॉटन श्रेडरसाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी केले असून अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असेही कळविण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर