महिला शेतकरी बिल हे महिलांना शेतीत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर करणारे ठरले - आमदार बसवराज पाटील
लातूर, 24 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्याचे यशस्वी व लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी क्रांतीकारी ''महिला शेतकरी बिल'' आणले. या ऐतिहासिक व धोरणात्मक निर्ण
बस्वराज पाटील


लातूर, 24 जुलै (हिं.स.)।

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्याचे यशस्वी व लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी क्रांतीकारी 'महिला शेतकरी बिल' आणले. या ऐतिहासिक व धोरणात्मक निर्णयावर आधारित असलेला 'देवाभाऊ कृषी माऊली सोहळा' हा उपक्रम महिलांना शेतीत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर करणारा एक नावीन्यपूर्ण प्रयोग ठरत आहे, असे प्रतिपादन आमदार तथा भाजप लातूर (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप महिला मोर्चा लातूर ग्रामीणच्या वतीने 'देवाभाऊ कृषी माऊली सोहळ्याचे' आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून आमदार बसवराज पाटील बोलत होते.

या सोहळ्यास लातूर जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई पाटील तळेगावकर, नवनिर्वाचित प्रदेश महामंत्री उत्तराताई कलबुर्गे, सौ. शोभाताई अभिमन्यू पवार, कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ अंजलीताई गुंजाळ, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती कविताताई गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांना मोफत कृषी किटचे वाटप करण्यात आले तसेच थेट माती परीक्षण प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. महिलांच्या श्रमाची बचत व्हावी यासाठी प्रगत भाजीपाला बियाणे, शेती उपयोगी अवजारे आणि सुरक्षेसाठी टॉर्च यांचा समावेश असलेले 'कृषी माऊली किट' महिलांना प्रदान करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी महिलांना शेतातील मातीचा नमुना घेणे आणि जमिनीची सुपीकता ओळखण्याचे थेट प्रात्यक्षिक दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पनाताई गायकवाड यांनी अतिशय प्रभावीपणे केले. या सोहळ्यास परिसरातील महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande