
रत्नागिरी, 24 जुलै (हिं.स.) । जिल्ह्यात गेल्या उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने तीन तालुक्यांमधील ७० गावांमधील १६२ वाड्यांमधील ४७ हजार ४४८ लोकांना १८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. टंचाईग्रस्तांची तहान भागवण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून ४५ लाख ३१ हजार ३८ रुपये खर्च करण्यात आले. ही रक्कम खेड, चिपळूण आणि रत्नागिरी या तीन पंचायत समित्यांना वितरित करण्यात आली आहे.
यंदा 'एल निनो'च्या प्रभावाने पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील लोकांना पाणीटंचाईचे अधिक चटके सोसावे लागले. उशिरापर्यंत पाणीटंचाई सुरू राहिल्याने टंचाईग्रस्तांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली होती. मे व जून महिन्यात टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठा करताना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची दमछाक झाली. जिल्ह्यात शासकीय ३ आणि खासगी १५ अशा एकूण १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र हा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने ग्रामस्थांनी स्वखर्चाने टँकरने पाणी मागवून आपली तहान भागवली.
दरवर्षी टंचाईच्या कालावधीत शासकीय टँकर कमी पडत असल्याने भाडेपट्ट्याने टँकर घेऊन पाणीपुरवठा केला जातो. यंदा शासकीय टँकर केवळ ३ असल्याने १५ खासगी टँकरवर भर देण्यात आला होता. एकूण १८ टँकरनी ३,१७७ फेऱ्या मारून ४७,४४८ टंचाईग्रस्तांची तहान भागवली.
जिल्ह्यातील एकूण ७ तालुक्यांमधील ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. मात्र सध्या केवळ ३ तालुक्यांसाठी टँकरचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. उर्वरित मंडणगड, दापोली, गुहागर आणि संगमेश्वर या तालुक्यांतील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात आलेल्या टँकरचे अनुदान अद्याप आलेले नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी