
परभणी, 24 जुलै (हिं.स.)। किशोरावस्था ही मुलींच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील अवस्था आहे. या काळात वैयक्तिक स्वच्छता राखणे, पुरेशी झोप घेणे, मोबाईलचा मर्यादित वापर करणे आणि सकारात्मक विचारसरणी जोपासणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आयुर्वेद चिकित्सक डॉ. अर्चना ढमढेरे यांनी केले.
येथील नूतन विद्या समिती संचलित मराठवाडा हायस्कूलच्या शिवाजीनगर शाखेत किशोरवयीन मुलींसाठी आयोजित केलेल्या ‘कळी उमलताना’ या विषयावरील विशेष आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. संस्थेचे सहसचिव तथा मुख्याध्यापक अनंत पांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात आयुर्वेद चिकित्सक डॉ. ढमढेरे व स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. स्नेहल बोंडे यांनी विद्यार्थिनींना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षिका चात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना प्रमुख मार्गदर्शक डॉ. ढमढेरे यांनी किशोरावस्था ही मुलींच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील अवस्था असल्याचे सांगत या काळातील शारीरिक व मानसिक बदलांना सकारात्मक दृष्टीकोनातून स्वीकारण्याचे आवाहन केले. संतुलित आहार, हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध व कडधान्यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थिनींना पटवून दिले. शरीर निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, सूर्यनमस्कार, योगासने आणि प्राणायाम करण्याचा सल्ला देत योगामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक तणाव कमी होऊन आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढते, असे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ शिक्षिका चात्रे यांनी विद्यार्थिनींना आत्मविश्वास, शिस्त, संस्कार आणि चारित्र्य यांचे महत्त्व पटवून देत शिक्षणासोबतच चांगले व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी वाचन, सकारात्मक विचार, वेळेचे नियोजन आणि पालकांचा आदर या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक अनंत पांडे यांनी आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षितता या जीवनातील तीन महत्त्वाच्या बाबी असल्याचे सांगितले. आजच्या स्पर्धात्मक युगात मुलींनी शिक्षणासोबत स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घेत आत्मविश्वासाने पुढे जावे, असे आवाहन त्यांनी केले. कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी शाळा प्रशासन, शिक्षक आणि पालक विद्यार्थिनींच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविकातून विद्या सोनूने यांनी कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. किशोरवयात मुलींमध्ये होणारे शारीरिक, मानसिक व भावनिक बदल समजून घेणे, आरोग्यदायी सवयी अंगीकारणे, आत्मविश्वास वाढविणे आणि सुरक्षिततेची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उपस्थित प्रमुख अतिथींचा परिचय करून देत त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती शेळके यांनी केले, तर चव्हाण मॅडम यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद आणि विद्यार्थिनींचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्या सोनूने, जोशी, शेळके, चात्रे, चव्हाण, पोपळगट, स्वामी, खतिंग यांच्यासह सर्व महिला शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींना आरोग्य, स्वच्छता, सुरक्षितता आणि आत्मविश्वास याविषयी उपयुक्त मार्गदर्शन लाभले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis