
यवतमाळ, 24 जुलै (हिं.स.)
राळेगाव तालुक्यातील पिंपळापूर येथे शेतकरी आत्महत्येची वेदनादायी घटना समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन तरुण मुलांनी आत्महत्या केल्यानंतर, आता वडिलांनीही आत्महत्या केल्याची घटना उजेडात आली. ज्ञानेश्वर माधवराव मालेकर (६२, रा. पिंपळापूर, ता. राळेगाव) असे मृताचे नाव आहे. त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. शेतीच्या अर्थकारणात अपयश आल्याने एकाच घरातील तीन पुरुषांनी आत्महत्येचा मार्ग निवडल्याच्या या घटनेने, जिल्ह्यातील शेतकरी किती तीव्र आर्थिक आणि मानसिक तणावाखाली जगत आहेत, याचे विदारक चित्र पुढे आले आहे.
ज्ञानेश्वर मालेकर यांच्याकडे पाच एकर शेती होती. निसर्गाच्या लहरीपणावर मात करून सिंचनाची सोय व्हावी यासाठी त्यांनी सहा वर्षांपूर्वी कर्ज काढून लाखो रुपये खर्च केले आणि शेतात बोअरवेल खोदली. वीज जोडणीसाठी आवश्यक असणारी सर्व अधिकृत प्रक्रिया त्यांनी वेळेत पूर्ण केली होती. वडकी येथील महावितरण कार्यालयाकडे विहित ‘डिमांड’ची रक्कमही भरली होती. ही डिमांड भरूनही दीर्घ कालावधी लोटला तरी त्यांना वीजजोडणी मिळालीच नाही. शेतात पाणी उपलब्ध असूनही विजेअभावी पेरणीनंतर पिकांना पाणी देता आले नाही. यावर्षी पावसाला झालेला विलंब, सततची नापिकी, उत्पादनाचा झालेला खर्च आणि डोक्यावर वाढत जाणारे व्याज यामुळे ते खचून गेले होते, असे कुटुंबियांनी सांगितले.
या घटनेतील सर्वात सुन्न करणारी बाब म्हणजे याच कुटुंबातील दोन्ही मुलांनी शेतीच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांच्या मोठ्या मुलाने २०२२ मध्ये तर लहान मुलाने २०२४ मध्ये कर्ज बाजारीपणास कंटाळून आत्महत्या केली होती. दोन तरुण मुलांच्या मृत्यूचा धक्का सहन करत ज्ञानेश्वर मालेकर आणि त्यांची पत्नी कसेबसे दिवस काढत होते. परंतु, एकीकडे मुलांच्या जाण्याचे दुःख आणि दुसरीकडे सावकारी व बँकांचे कर्ज, प्रलंबित वीज जोडणी आणि शेतीतील सततचा तोटा या दुष्टचक्रातून सुटका न दिसल्याने अखेर ज्ञानेश्वर मालेकर यांनीही टोकाचे पाऊल उचलले. आता या कुटुंबात केवळ त्यांची वृद्ध पत्नी निमाबाई ही एकटीच उरली आहे.
जिल्ह्यावर शेतकरी आत्महत्यांचे सावट
यवतमाळ जिल्हा हा देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. शासकीय आकडेवारीनुसार आणि अहवालानुसार, जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आत्महत्यांमागे सिंचन आणि विजेचा अभाव, कर्जबाजारीपणा आणि नापिकी, प्रशासकीय अनास्था अशी करणे आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सतत आत्महत्या होत आहेत. गेल्या सहा महिन्यात १२० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासन दप्तरी झाली आहे.
----------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी