
लातूर, 24 जुलै (हिं.स.)।अमृत आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथील आयटी पार्क येथे आयोजित १८ दिवसीय निवासी 'अमृत सूर्यमित्र' प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. सौरऊर्जा क्षेत्रातील वाढत्या संधींच्या पार्श्वभूमीवर युवकांना तांत्रिक कौशल्ये, रोजगाराच्या संधी तसेच स्वयंरोजगारासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळवून देणे, या मुख्य उद्देशाने या विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास ऑनलाइन माध्यमातून अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी, मंगेश खाडिलकर, अमित सामंत, एमसीईडीचे राज्य समन्वयक श्रीकांत कुलकर्णी, विभाग प्रमुख प्रदीप इंगळे तसेच विभागीय अधिकारी सुदाम थोटे यांनी सहभागी होऊन प्रशिक्षणार्थींना मोलाचे मार्गदर्शन केले. सौरऊर्जा क्षेत्राचे वाढते महत्त्व अधोरेखित करत या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या विविध संधींचा युवकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.
या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक प्रवीण कस्तुरे उपस्थित होते. त्यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधताना, प्रशिक्षणादरम्यान मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वतःचा रोजगार अथवा स्वयंरोजगार सुरू करावा, असे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर व चिंतेश जोशी, एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी दीपक गायकवाड व अमोल दिवेकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
अमृत 'सूर्यमित्र' प्रशिक्षण कार्यक्रमामुळे प्रशिक्षणार्थींमध्ये सौरऊर्जा क्षेत्रातील तांत्रिक कौशल्या बरोबरच रोजगार व स्वयंरोजगाराच्या दृष्टीने मोठा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. या प्रशिक्षणादरम्यान मिळालेले तांत्रिक ज्ञान आणि व्यावहारिक अनुभव यांचा उपयोग करून प्रशिक्षणार्थींनी भविष्यात सौरऊर्जा क्षेत्रात आपले करिअर घडवावे आणि इतरांसाठीही रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, असा संदेश या वेळी देण्यात आला.
प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींनी आनंद व्यक्त करत अमृत व एमसीईडीच्या या उपक्रमामुळे सौरऊर्जा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी नवी दिशा व प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis