आषाढी वारीत ‘आयुष सेवा सुविधा केंद्र’; वारकऱ्यांना मोफत आयुर्वेद, होमिओपॅथी व योगसेवा
सोलापूर, 24 जुलै (हिं.स.)। आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांना पारंपरिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आयुष मंत्रालयाने ‘राष्ट्रीय आयुष वारी... विठ्ठल-रुक्मिणीच्या दारी’ या संकल्पनेअंतर्गत पंढरपुरात विविध ठिकाणी ‘आयुष सेवा सुविधा केंद्र’ सुरू केले आहे
wari


सोलापूर, 24 जुलै (हिं.स.)। आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांना पारंपरिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आयुष मंत्रालयाने ‘राष्ट्रीय आयुष वारी... विठ्ठल-रुक्मिणीच्या दारी’ या संकल्पनेअंतर्गत पंढरपुरात विविध ठिकाणी ‘आयुष सेवा सुविधा केंद्र’ सुरू केले आहेत. २४ ते २६ जुलै या कालावधीत या केंद्रांमधून वारकऱ्यांना मोफत आयुर्वेद, होमिओपॅथी, योग आणि विविध उपचारांचा लाभ दिला जाणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागात आयुर्वेद आणि पारंपरिक उपचारपद्धतीचा प्रचार-प्रसार करण्याबरोबरच वारकऱ्यांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत या सेवा सुविधा केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे.

पंढरपुरातील तीन रस्ता येथील महाआरोग्य शिबिर, चंद्रभागा नदीकाठावरील आरोग्य केंद्र (वाळवंट) आणि ६५ एकर परिसरातील आरोग्य केंद्र अशा तीन ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे.या केंद्रांमध्ये आयुर्वेदिक व होमिओपॅथी औषधांचे मोफत वाटप, योग मार्गदर्शन, स्नेहन-स्वेदन (वाफ उपचार), तेल मालिश, विद्धकर्म, अग्नीकर्म, चरण सेवा तसेच आयुष विषयक माहिती प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी आयुष विभागाचे वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक, डॉक्टर, इंटर्न्स तसेच सोलापूर जिल्ह्यातील २८ आयुर्वेद व होमिओपॅथी महाविद्यालयांचे तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. तसेच नेचरफिट संस्थेतर्फे औषधांचे मोफत वितरण करण्यात येणार असून, या उपक्रमामुळे वारकऱ्यांना पारंपरिक आरोग्यसेवेचा प्रभावी लाभ मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande