
पुणे, 24 जुलै (हिं.स.)। जन्म किंवा मृत्यू दाखल्यातील पूर्ण नाव बदलणे शक्य नसून, केवळ काना, वेलांटी, मात्रा तसेच स्पेलिंगमधील त्रुटी दुरुस्त करता येतात, असा महत्त्वपूर्ण खुलासा पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी केला आहे. नाव बदलायचे असल्यास जुने नाव कायम ठेवून 'ऊर्फ' म्हणून दुसरे नाव नोंदविता येईल, मात्र संपूर्ण नाव बदलण्याचा अधिकार महापालिकेकडे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
भिमाले यांनी सांगितले की, जन्म-मृत्यू दाखल्यांतील नावातील बदलाची प्रक्रिया केंद्र शासनाच्या सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टिम (CRS) द्वारे केली जाते. त्यामुळे या प्रक्रियेत महापालिकेला स्वतंत्र अधिकार नसल्याने पूर्ण नाव बदलणे शक्य नाही.गेल्या आठवड्यात स्थायी समितीच्या बैठकीत उच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देत जन्म व मृत्यू दाखल्यांमध्ये बदल करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर प्रशासन स्तरावर काहीसा गोंधळ निर्माण झाला. क्षेत्रीय कार्यालये आणि जन्म-मृत्यू नोंदणी विभागात नागरिक व अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत संभ्रम आणि वादाचे प्रसंगही घडले. याच पार्श्वभूमीवर स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
भिमाले यांनी स्पष्ट केले की, शहरातील रुग्णालयांकडून प्राप्त होणाऱ्या सर्व नवीन जन्म व मृत्यू घटनांची नियमानुसार नोंद केली जात असून, नागरिकांना दाखलेही वेळेत दिले जात आहेत. जन्म-मृत्यू नोंदणी किंवा दाखले मिळण्यात कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले.तसेच २०१९ पूर्वीच्या जन्म व मृत्यू नोंदी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार जुन्या नोंदणी प्रणालीतून नवीन सीआरएस प्रणालीमध्ये स्थलांतरित करण्याचे काम सुरू असून, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित नोंदी अधिक सुलभपणे उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु