ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ‘आनंदी वाचनपेटी’ उपक्रम; जि.प. शाळेला १११ पुस्तकांची भेट
परभणी, २४ जुलै (हिं.स.) : विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजावी आणि “मोबाईलशी कट्टी... पुस्तकांशी गट्टी” हा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटिज (एचएआरसी) परभणी यांच्या वतीने मानवत तालुक्यातील रूढी जिल्ह
अ


परभणी, २४ जुलै (हिं.स.) : विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजावी आणि “मोबाईलशी कट्टी... पुस्तकांशी गट्टी” हा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटिज (एचएआरसी) परभणी यांच्या वतीने मानवत तालुक्यातील रूढी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला १११ पुस्तकांची ‘आनंदी वाचनपेटी’ भेट देण्यात आली.

एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक यांनी वाचनसंस्कृती जनजागृतीसाठी पुणे–आळंदी–पंढरपूर अशी २७५ किलोमीटर सायकलवारी पूर्ण केली. “१ किलोमीटर सायकलिंगसाठी १ पुस्तक” या अभिनव संकल्पनेतून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना पुस्तके भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रूढी येथील शाळेला ही वाचनपेटी देण्यात आली.

या कार्यक्रमाला डॉ. पवन चांडक, डॉ. दिनेश भुतडा, गटशिक्षणाधिकारी सुनील तोष्णीवाल, तापडिया, उमाकांत हाडुळे, मुख्याध्यापक घनचक्कर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी डॉ. पवन चांडक यांनी विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकांची नोंद ठेवावी, पुस्तक परीक्षण लिहावे, असे आवाहन केले. तसेच वर्षभरात सर्वाधिक पुस्तके वाचून नियमित नोंद ठेवणाऱ्या आणि उत्कृष्ट पुस्तक परीक्षण करणाऱ्या बालवाचकांचा सन्मान करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाकांत हाडुळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक घनचक्कर यांनी मानले.

एचएआरसी संस्थेने आतापर्यंत परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, बीड, लातूर, वाशीम, नाशिक आणि पुणे अशा ११ जिल्ह्यांतील ग्रामीण भागातील १९५ जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘आनंदी वाचनपेटी’ उपक्रम राबवून हजारो विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार पुस्तके पोहोचविली आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande