चांदोरी सायखेडा गावाला पाण्याचा वेढा; गावाचा संपर्क तुटला
प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे आदेश चांदोरी, 24 जुलै (हिं.स.)। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने सायखेडा आणि चांदोरी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सायखेड्याच्या पुलावरुन पाणी गेल्यामुळे सायखेडा, चा
Chandori Saikheda village


Chandori Saikheda village


Chandori Saikheda village


प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे आदेश

चांदोरी, 24 जुलै (हिं.स.)। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने सायखेडा आणि चांदोरी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सायखेड्याच्या पुलावरुन पाणी गेल्यामुळे सायखेडा, चांदोरी गावात पाणी शिरले आहे. दारणा व गोदावरी नदीच्या धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, चांदोरी, सायखेडा आणि गोदाकाठावरील अनेक गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात गोदावरी नदीला दुसऱ्यांदा पूर आला आहे. चांदोरी येथील ऐतिहासिक खंडेराव मंदिराला पुराच्या पाण्याने पूर्ण वेढा घातला आहे. गोदावरी नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे नदीकाठच्या शेतजमिनींमध्येही पाणी शिरले आहे. काही ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे. नदीचा प्रवाह आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे आणि तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी परिस्थितीचा आढावा घेत संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

सीईओ ओमकार पवार व अप्पर पोलीस अधीक्षक निलोत्मा राव यांची पूरस्थितीची पाहणी;

नाशिक जिल्ह्यात 23 व 24 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन निफाड तालुक्यातील चांदोरी व सायखेडा परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार तसेच अप्पर पोलीस अधीक्षक निलोत्मा राव यांनी पूरग्रस्त भागाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची सविस्तर पाहणी केली.

पूरग्रस्त भागात काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनांची वाहतूक शक्य नसल्याने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी ट्रॅक्टरवरून पूरग्रस्त भागात जाऊन नागरिकांच्या परिस्थितीची प्रत्यक्ष माहिती घेतली. नदीकाठच्या व बाधित वस्त्यांची पाहणी करून स्थानिक प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदत व बचाव कार्याचा आढावा घेण्यात आला.

यानंतर सर्व विभाग प्रमुख, आपत्ती व्यवस्थापन समिती तसेच संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत पूरग्रस्त नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या. स्थलांतरित नागरिकांना तात्पुरता निवारा, स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, स्वच्छता, अन्नधान्य व इतर मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले. महसूल, ग्रामपंचायत, आरोग्य, पोलीस आणि इतर सर्व विभागांनी समन्वयाने काम करून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती प्रभावीपणे हाताळावी, असेही यावेळी सांगण्यात आले.

ग्रामपंचायतीमार्फत सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांच्या राहण्याच्या व इतर आवश्यक सुविधांची पाहणी करण्यात आली. नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत प्रशासन त्यांच्या मदतीसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास देण्यात आला.

चांदोरी येथे सुमारे 400 कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले असून सुमारे 100 दुकाने पूरामुळे प्रभावित झाली आहेत. तसेच सायखेडा येथे 250 कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले असून सुमारे 125 दुकानांमधील मालाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संबंधित यंत्रणांकडून पंचनामे व नुकसानाचे सर्वेक्षण सुरू असून आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे.

यावेळी पंचायत समिती निफाडच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील, चांदोरीचे सरपंच विनायक खरात, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande