चंद्रपूर : कर्जमाफी-वीजबिल माफीने शेतकऱ्यांना मोठा दिलासा - मुनगंटीवार..
चंद्रपूर, 24 जुलै (हिं.स.)। राज्य सरकारने जाहीर केलेली ''पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना'' आणि शेतकऱ्यांच्या वीजबिल थकबाकी माफीचा निर्णय हा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढणारा ऐतिहासिक निर्णय असल्याचे प्र
चंद्रपूर : कर्जमाफी-वीजबिल माफीने शेतकऱ्यांना मोठा दिलासा - मुनगंटीवार..


चंद्रपूर, 24 जुलै (हिं.स.)। राज्य सरकारने जाहीर केलेली 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' आणि शेतकऱ्यांच्या वीजबिल थकबाकी माफीचा निर्णय हा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढणारा ऐतिहासिक निर्णय असल्याचे प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. भारतीय जनता पार्टीतर्फे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारच्या शेतकरीहिताच्या विविध निर्णयांची सविस्तर माहिती दिली.

मुनगंटीवार म्हणाले की, राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' ही ऐतिहासिक योजना आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी असलेली ५० हजार रुपयांची मर्यादा हटविण्यात आली असून, आता पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. याशिवाय नियमित कर्जफेडीची अटही रद्द करण्यात आल्याने कोणताही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.राज्यातील शेतकऱ्यांची ४८ हजार कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी माफ करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे. साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांसाठी आधीच वीजबिल आकारले जात नसले, तरी जुन्या थकबाकीचे ओझे शेतकऱ्यांवर होते. आता ही थकबाकी पूर्णपणे माफ करण्यात येणार असल्याने लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

सौरपंप आणि सौर कृषीवाहिनी योजनांमुळे 76 टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुरू झाला असून, वर्षअखेरीपर्यंत हा आकडा शंभर टक्क्यांवर नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. तसेच नदीजोड प्रकल्प, नवीन धरणे आणि धरणांची उंची वाढविण्याच्या माध्यमातून राज्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचे नियोजन सरकारने हाती घेतले असून, भविष्यात विदर्भ व मराठवाड्यातील कोणताही जिल्हा दुष्काळग्रस्त राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय कोणत्याही राजकीय हेतूने नव्हे, तर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच घेतले जात असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महापौर संगीता खांडेकर, माजी आमदार अतुल देशकर, भाजपा नेते राजेंद्र गांधी, डॉ. मंगेश गुलवाडे, राहुल पावडे आणि ब्रिजभूषण पाझारे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande