
रायगड, 24 जुलै (हिं.स.)। : लायन्स क्लब श्रीबागच्या वतीने स्पर्धा विश्व अकॅडमी, अलिबाग येथे ज्येष्ठ विधिज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. ॲड. निहा अनिस राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. युवक-युवतींमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने झालेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमात एम.जे.एफ. डॉ. ॲड. निहा अनिस राऊत (डी.सी. ग्लोबल क्लॉज) यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दारू, तंबाखू आणि इतर व्यसनांमुळे आरोग्य, कुटुंब व समाजावर होणाऱ्या गंभीर परिणामांची सविस्तर माहिती दिली. व्यसन करायचेच असेल तर अभ्यासाचे, व्यायामाचे, चांगल्या सवयींचे आणि समाजसेवेचे करा, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यशस्वी आयुष्यासाठी शिक्षण, शिस्त आणि सकारात्मक विचारांची कास धरण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका ॲड. कला पाटील यांनी भगवद्गीतेतील जीवनमूल्यांचे महत्त्व अधोरेखित करत नैतिकता, आत्मसंयम आणि सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचे उत्साहाने स्वागत केले.
या कार्यक्रमाला प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी, स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका सुचिता साळवी तसेच अकॅडमीचे शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत प्रभावी जनजागृती घडवून सकारात्मक जीवनमूल्यांचा संदेश देण्यात आला. अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढण्यास मदत होत असून, अशा कार्यक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)