
अमरावती, 24 जुलै (हिं.स.) : मोर्शी-वरुड तालुक्यात महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत वाढीव वीजबिल, पूर्वसंमतीशिवाय मीटर बदलणे आणि तक्रारींना प्रतिसाद मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी महावितरणवर टीका करीत ग्राहकांच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
देवेंद्र भुयार यांनी प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे की, महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी, लघुउद्योजक आणि मध्यमवर्गीयांवर वाढीव वीजबिलांचा अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची स्वतंत्र तांत्रिक समितीकडून चौकशी करावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत वादग्रस्त वाढीव बिलांची सक्तीची वसुली थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली. ग्राहकांची लेखी संमती घेतल्याशिवाय मीटर बदलू नये, प्रत्येक ग्राहकाला मीटर रीडिंग, वीजवापर आणि बिलाची पारदर्शक माहिती उपलब्ध करून द्यावी, चुकीची बिले तातडीने दुरुस्त करावीत तसेच तालुकास्तरावर विशेष तक्रार निवारण शिबिरे आयोजित करावीत, अशाही मागण्या त्यांनी केल्या.
भुयार यांनी इशारा देताना सांगितले की, जनतेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून महावितरणने स्मार्ट मीटरची सक्ती केली, तर वीज ग्राहकांसोबत रस्त्यावर उतरून महावितरण कार्यालयांसमोर लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारले जाईल. मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांनी स्मार्ट मीटर योजनेबाबत नागरिकांच्या मनातील शंका दूर करून तक्रारींची निष्पक्ष चौकशी करावी व ग्राहकांना दिलासा देण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी