
परभणी, 24 जुलै (हिं.स.)। आधुनिक शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, अध्यात्मिक विचार, सामाजिक मूल्ये आणि भारतीय संस्कृतीची जपणूक होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्रीराम प्रतिष्ठान, सेलूचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी केले.
देवशयनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून येथील एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शालेय परिपाठाच्या वेळी भक्तिमय वातावरणात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोेलत होते. याप्रसंगी मुख्याध्यापिका मीरा मिरांडा तसेच अनिल व अब्दुल यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल नामाच्या गजरात दिंडी व पालखी सोहळ्याने झाली. त्यानंतर डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल-पांडुरंगावरील अभंग, भक्तिगीते, गवळणी, समूहगायन तसेच पारंपरिक वेशभूषेतील समूह नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे दिग्दर्शन मिलिंद खंदारे यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. रोडगे यांनी संतपरंपरा, वारकरी संप्रदाय आणि भारतीय संस्कृतीमध्ये आषाढी एकादशीचे असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो, असेही त्यांनी नमूद केले. मराठी विषयाचे शिक्षक अयोध्या चौरे, माने सर व घुगे सर यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व, वारकरी संप्रदायाची परंपरा तसेच पंढरपूर यात्रेची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रीना ठाकूर यांनी केले. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कलाविष्काराचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis