
अमरावती, 24 जुलै (हिं.स.) : धारणी तालुक्यातील धारणी–मांडवा मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, पावसामुळे रस्त्यावर पडलेल्या खोल खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. रस्ता आणि खड्डा यामधील फरक ओळखणे कठीण झाल्याने प्रत्येक प्रवास जीवघेणा ठरत असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या मार्गावरून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, रुग्णवाहिका तसेच अत्यावश्यक सेवांची वाहतूक होत असते. मात्र रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अधिक धोकादायक ठरत असून, पाण्याखाली दडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचा तोल जाऊन अपघाताचा धोका वाढला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या १५ वर्षांत या मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी प्रभावी काम करण्यात आलेले नाही. त्यामुळे संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी आणि निवेदने देऊनही केवळ आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवालही ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. वेळेत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
धारणी–मांडवा मार्गाची तातडीने उच्चस्तरीय पाहणी करून कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा भविष्यात या मार्गावर होणाऱ्या अपघातांची जबाबदारी संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि प्रशासनावर राहील, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी