
बीड, 24 जुलै (हिं.स.)।
कौटुंबिक वादातून दारूच्या नशेत पतीने स्वतःच्या शिक्षिका असलेल्या पत्नीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत पत्नीच्या उजव्या डोळ्याच्या वर दुखापत झाली असून मारहाण करत जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी पतीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ज्ञानदीप विद्यालय येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या ३६ वर्षीय सरिता राजेंद्र बोरकर यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्या तांदळवाडी रोड, धारूर येथे पती राजेंद्र निवृत्ती बोरकर आणि दोन मुलांसह राहतात. २१ जुलै रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास पती राजेंद्र हे दारू पिऊन घरी आले. दारू का प्यायलात असा जाब विचारल्याच्या रागातून त्यांनी पत्नीला शिवीगाळ केली आणि घरात असलेल्या चाकूने उजव्या डोळ्यावर मारून जखमी केले. तसेच लाथांनी कंबरेवर मारहाण करून पुन्हा विचारल्यास गळा दाबून मारण्याची धमकी दिली.
भांडणाचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी मध्यस्थी करत सुटका केली. प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार पूर्ण झाल्यानंतर पीडितेने पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.
या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात आरोपी राजेंद्र निवृत्ती बोरकर विरुद्ध बीएनएस कलम ११५(२), ११८(१), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस शिपाई रेवणनाथ दुधाणे करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis