
लातूर, 24 जुलै (हिं.स.)। हृदयविकाराचा झटका किंवा श्वासोच्छ्वास बंद पडल्यास तातडीने दिले जाणारे सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन) हे जीवनरक्षक कौशल्य प्रत्येकाने आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचा संदेश भारतीय बालरोग संघटनेतर्फे (इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स) आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमातून देण्यात आला. लातूर येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित या प्रशिक्षणाला मोठा प्रतिसाद मिळाला.
स्व. डॉ. आनंद शाडिल्य यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देशभर एकाच दिवशी जीवन वाचवणाऱ्या कौशल्याचे प्रशिक्षण देण्याच्या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. व्ही. डी. केंद्रे (कांदे) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण समन्वयक डॉ. दिपीका माशाळकर यांच्या नेतृत्वात डॉ. शितल भट्टड, डॉ. विशाखा पडिले आणि डॉ. नैना गोडबोले यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. या उपक्रमात ५० हून अधिक प्रशिक्षित डॉक्टर सहभागी झाले.
प्रशिक्षणादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यास किंवा श्वासोच्छ्वास बंद पडल्यास तातडीने छातीवर दाब देण्याची योग्य पद्धत, कृत्रिम श्वसन प्रक्रिया आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद कसा द्यावा याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. वेळेवर सीपीआर दिल्यास रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते, यावर विशेष भर देण्यात आला.
या कार्यक्रमासाठी एमआयटी लातूरचे परिसर समन्वयक पृथ्वीराज कराड, अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार, उपअधिष्ठाता डॉ. बी. एन. नागोबा, रुग्णालय अधीक्षक डॉ. भागवत जाधव, डॉ. चंद्रकला पाटील यांचे सहकार्य लाभले. तसेच डॉ. गायत्री, डॉ. प्रथमेश आणि डॉ. विवेक यांनी प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis