
लातूर, 24 जुलै (हिं.स.)।
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, लातूर तालुक्याच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प संचालक संजय इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली 24/07/2026 रोजी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सभागृह लातूर येथे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट ग्रामसखी, बँक लिंकेज सखी तसेच यशस्वी व्यावसायिक महिलांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विशाल गोंडसे यांनी बचत गटांना बँकांमार्फत उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या टर्म लोन, कॅश क्रेडिट, कर्ज प्रक्रियेचे स्वरूप तसेच बचत गटांना आकारण्यात येणाऱ्या व्याजदरां विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच दीपक कदम यांनी ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे वाढते प्रकार, त्यापासून बचावासाठी घ्यावयाची सतर्कता, सुरक्षित डिजिटल व्यवहार आणि सायबर सुरक्षेबाबत उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
चेतन मुसळे यांनी बँक खात्यास वारसदार (Nominee) जोडण्याचे महत्त्व, दीर्घकाळ व्यवहार न झाल्यामुळे निष्क्रिय झालेली बँक खाती पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया तसेच फाटक्या व खराब झालेल्या नोटा बदलून घेण्याची पद्धत याबाबत सविस्तर माहिती दिली.प्रसंगी जिल्हा लीड बँक मॅनेजर राहुल आठवले तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे हे उपस्थित होते.
या प्रशिक्षणासाठी ग्रामसखी, बँक लिंकेज सखी, बचत गटातील व्यावसायिक महिला व बचत गटांच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आर्थिक व्यवहारांबाबत जागरूकता वाढविणे, सुरक्षित बँकिंग व्यवहारांना प्रोत्साहन देणे आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis