
नांदेड, 24 जुलै (हिं.स.)।
विकसित भारत व विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने लोकाभिमुख, गुणवत्तापूर्ण आणि नावीन्यपूर्ण कामांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे. शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा वापर करून कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक करण्यावर भर द्यावा, असे निर्देश छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित बैठकीत विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी विशेष सखोल पूर्ननिरीक्षण (एसआयआर) अभियानासह महसूल विभागाच्या विविध योजनांचा व कामांचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहआयुक्त (महसूल) राजेश काटकर, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी हनुमंत कोळेकर, राजकुमार माने, प्रियंका पवार-कर्डिले, तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले की, छत्रपतीसंभाजीनगर येथे आशियातील सर्वात मोठ्या औद्योगिक प्रकल्पांपैकी एका प्रकल्पाची उभारणी येत्या कालावधीत होत आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील आयटीआय संस्थांच्या माध्यमातून युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविण्याचे नियोजन करावे. त्यामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
ते म्हणाले, जिल्ह्यात नवीन उद्योग उभारण्यासाठी अनेक उद्योजक पुढे येत आहेत. अशा उद्योजकांच्या प्रस्तावांना गती देणे, त्यांच्या अडचणी तातडीने दूर करणे आणि त्यांना सकारात्मक सहकार्य करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. महसूल विभागाने उद्योगांना आवश्यक परवानग्या व जमीनविषयक प्रकरणे वेळेत निकाली काढावीत.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis