
पुणे, 24 जुलै (हिं.स.)। राज्यभर अन्नभेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने धडक तपासणी मोहिमा सुरू केल्या असल्या, तरी प्रयोगशाळांतील अपुऱ्या सुविधा आणि वाढत्या नमुन्यांच्या ओझ्यामुळे तपासणी प्रक्रियेला मोठा विलंब होत आहे. पुणे विभागात जून महिन्यात ८५८ नवीन अन्ननमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याचवेळी आधीचे १,०६४ नमुने प्रलंबित असल्याने प्रयोगशाळेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जूनमध्ये केवळ ८३९ नमुन्यांचे अहवाल पूर्ण होऊ शकले. त्यापैकी ४४ नमुने भेसळयुक्त असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अन्नभेसळीविरोधातील कारवाई प्रभावीपणे राबविण्यास प्रयोगशाळेतील मर्यादित क्षमता अडथळा ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांतील अन्ननमुने महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे येथील प्रयोगशाळेत तपासले जातात. गेल्या दोन-अडीच महिन्यांत तपासणीसाठी येणाऱ्या नमुन्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पूर्वी दरमहा सुमारे ३०० नमुने येत असताना आता ही संख्या हजाराच्या पुढे गेली आहे.वाढत्या ताणामुळे प्रयोगशाळेच्या उपसंचालकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांना पत्र पाठवून १ ते १० जुलै या कालावधीत नवीन नमुने स्वीकारणे शक्य नसल्याचे कळविले होते. परिणामी, या काळात पुणे विभागातील धडक कारवायांमध्ये संकलित करण्यात आलेले अन्ननमुने मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेत पाठवावे लागले. त्यामुळे अनेक अहवालांना विलंब झाला. याशिवाय, पुणे प्रयोगशाळेत शालेय पोषण आहार, शासकीय रुग्णालये, शासकीय गोदामे तसेच विविध शासकीय संस्थांकडून पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची तपासणीही प्रलंबित असल्याने प्रयोगशाळेवरील कामाचा ताण आणखी वाढला आहे. त्यामुळे अन्नभेसळीविरोधातील कारवाईचा वेग कायम ठेवण्यासाठी प्रयोगशाळांची क्षमता वाढविणे आणि आवश्यक मनुष्यबळ व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु