
परभणी, २४ जुलै (हिं.स.) : भारतीय जनता पार्टी परभणी महानगर महिला मोर्चाच्या वतीने आयोजित “देवा भाऊ कृषी माऊली सोहळ्या” अंतर्गत परभणी शहरातील रामकृष्ण नगर येथे १५० शहरी महिलांना बागकाम आणि घरगुती भाजीपाला लागवडीसाठी मोफत कृषी किटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेत्या डॉ. मीनाताई परतानी होत्या. यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीभाऊ भरोसे, शहर जिल्हा महामंत्री भालचंद्रजी गोरे, लताताई वाकळे, मीनाताई वडपुरकर, तसेच ज्येष्ठ नागरिक सुधाकर डावरे व वर्षाली डावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भालचंद्रजी गोरे यांनी महिलांनी घरच्या घरी भाजीपाला व फळझाडांची लागवड करून सेंद्रिय शेतीचा स्वीकार करावा, असे आवाहन केले. शहरातील महिला शेतकरी व गृहिणींना आधुनिक आणि शाश्वत शेतीची माहिती देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे निवृत्त हॉर्टिकल्चर अधिकारी सुधाकर डावरे यांनी फळझाडे, भाजीपाला व फुलझाडांची लागवड, मातीची तयारी, सेंद्रिय खतनिर्मिती आणि घरगुती बागकाम याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. तसेच महिलांनी त्यांच्या निवासस्थानी विकसित केलेल्या बागांची पाहणी करून उपलब्ध जागेत भाजीपाला व फळझाडे लावण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजिका व मनपाच्या माजी गटनेत्या मंगलताई मुदगलकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ऋतुजा जोशी यांनी केले, तर महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा मनीषाताई जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis