
अमरावती, 24 जुलै, (हिं.स.) दारिद्रयरेषेखालील (बीपीएल), तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील घरगुती वीज ग्राहकांना कायमस्वरूपी वीजबिलातून दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलार (स्मार्ट)’ योजना सुरू केली आहे. या योजनेत केंद्र आणि राज्य शासनाच्या एकत्रित अनुदानामुळे बीपीएल ग्राहकांना अवघ्या २,५०० रुपयांत १ किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारता येणार आहे. ८ हजारांवर ग्राहकांनी योजनेसाठी अर्ज केला आहे, पण तिघांनीच आवश्यक रकमेचा भरणा केला आहे.
१९ हजारांवर ग्राहकांना लाभ होणार
अमरावती परिमंडळातील ४ लाख ३९ हजार ८०९ ग्राहक या योजनेसाठी पात्र आहेत. यात अमरावती जिल्ह्यात २ लाख १३ हजार ५९२ आणि यवतमाळ जिल्ह्यात २ लाख २६ हजार २५७ ग्राहकांचा समावेश आहे. २०२६ – २७ या वर्षात परिमंडळातील १९ हजार ४३ लाभार्थ्यांना योजनेत सहभागी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यात दारिद्र्यरेषेखाली पात्र असलेल्या २ हजार ८८ ग्राहकांचा समावेश असून सर्वसामान्य ग्राहकांची संख्या १६ हजार ९५५ आहे.
लाभार्थ्यांना १७,५०० रुपये अतिरिक्त अनुदान
१ किलोवॅट सौर प्रकल्पासाठी अंदाजे ५० हजार रुपये खर्च येतो. केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ अंतर्गत ३० हजार रुपयांचे अनुदान मिळते. त्यावर राज्य शासनाकडून बीपीएल लाभार्थ्यांना १७ हजार ५०० रुपये अतिरिक्त अनुदान दिले जाणार आहे.त्यामुळे या ग्राहकांना केवळ २५०० रूपयेच आपला लाभार्थी हिस्सा भरायचा आहे. त्याच प्रमाणे अनुसूचित जाती-जमातींसाठी राज्यशासनाचे अतिरिक्त अनुदान १५ हजार रूपये असल्याने या वर्गवारीतील लाभार्थ्यांना ५ हजार रूपये भरून योजनेचा लाभ घेता येतो, तर इतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांना १० हजार रूपये भरून योजनेचा लाभ घेता येणार आहे.
तीन ग्राहकांनीच भरली रक्कम
अमरावती परिमंडळात ८ हजार ८२ नागरीकांनी या योजनेत लाभ घेण्यासाठी अर्ज केला असून त्यांची तांत्रिक बाबींचा सर्वे करून मान्यता देण्यात आली आहे. परंतु केवळ ३ जणांनीच सहभागी होण्यासाठी आवश्यक रकमेचा भरणा केला आहे.
‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’
वैध वीजजोडणी, छतावर सौर पॅनेल बसविण्यासाठी जागा, मागील १२ महिन्यांचा सरासरी वीजवापर १०० युनिटपेक्षा कमी असणे आणि यापूर्वी कोणत्याही सौर अनुदानाचा लाभ न घेतलेला असणे आवश्यक आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर योजना राबविण्यात येत असून, पात्र नागरिकांनी त्वरित अर्ज करावेत, असे आवाहन मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.
-------------------------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी