
बीड, 24 जुलै (हिं.स.)। दिवसा रेकी करून रात्रीच्या वेळी घरे फोडणाऱ्या एका कुख्यात टोळीचा बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत कृष्णा शेषराव राठोड (वय २५, रा. अंबुनाईक तांडा, ता. गेवराई) या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून सुमारे पाच लाख रुपये किमतीचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फिर्यादी जेवण करून झोपलेले असताना अज्ञात चोरांनी लोखंडी कपाट उघडून सोन्याचे दागिने चोरून नेले होते. तसेच गावातील इतर महिलांच्या अंगावरील दागिनेही चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता. या घटनेचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे कृष्णा राठोड याला सासरवाडीला म्हणजे नाळवंडी तांडा येथे आल्याची माहिती मिळताच सापळा रचून ताब्यात घेतले. त्याने आपल्या इतर पाच साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली असून, इतर साथीदार सध्या फरार आहेत. त्याच्याकडून पिंपळनेर आणि वडवणी येथील घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून जवळपास तीन तोळे सोने व दहा भार चांदी असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जप्त केलेला ऐवज पुढील कारवाईसाठी पोलिसांकडे जमा करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा पिंपळनेर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis